लातूर : प्रतिनिधी
अत्यल्प पाऊस होवूनही लातूर, औसा या तालुक्यांसह लातूर जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर न झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे, असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्वरित लातूर, औसा या तालुक्यांसह लातूर जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंर्त्यांकडे पत्राद्वारे केली.
सरकारने राज्यातील केवळ ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. पण, या यादीत लातूर ग्रामीण मतदारसंघातील लातूर आणि औसा तालुक्यांचा समावेश नाही. तसेच, रेणापूर वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचाही समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून दुष्काळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, औसा आणि लातूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याची उपलब्धतता नसल्याने रब्बीचीही आशा मावळली आहे. जनावरांच्या चा-याचा, पाण्याचा प्रश्न आत्तापासूनच निर्माण होवू लागला आहे. त्यामुळे लातूर, औसा तालुक्यांसह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होणे आवश्यक होते. याबाबतच्या घोषणेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी बांधवांना निराशेला सामोरे जावे लागले आहे. याची सरकारने संवेदनशीलतेने दखल घेवून तातडीने लातूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी आमदार धिरज देशमुख यांनी केली.