26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रभारतात डेंग्यू, झिकावरील लस विकसित!

भारतात डेंग्यू, झिकावरील लस विकसित!

पुणे : प्रतिनिधी
राज्यात डेंग्यू आणि झिकाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचवेळी देशात डेंग्यू आणि झिकावरील लस विकसित करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. या दोन्ही रोगांवरील लस विकसित करण्यात आली असून, त्यांच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या लशी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

देशात सध्या डेंग्यूच्या लशीवर ४ संस्थांकडून संशोधन सुरू आहे. सरकारने राष्ट्रीय जैववैद्यक धोरणांतर्गत डेंग्यू लसीच्या चाचण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच याबाबत लोकसभेत माहिती दिली. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हैदराबादमधील पॅनासिआ बायोटेक कंपनीबरोबर डेंग्यूवरील लशीच्या चाचण्यांसाठी सामंजस्य करार केला आहे. डेंगीऑल असे या लसीचे नाव असून, तिच्या चाचण्या ५ वर्षांसाठी घेतल्या जाणार आहेत. ही डेंग्यूची एक मात्रा असलेली लस असणार आहे. तिची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे. या लसीची पहिली व दुसरी चाचणी पूर्ण झाली असून, तिस-या टप्प्यातील चाचणीसाठी भारतीय औषधे महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.

याचबरोबर इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) कंपनीकडूनही डेंग्यूची लस विकसित केली जात आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होणार आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली असून, तिचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

एनआयएचकडून तंत्रज्ञान हस्तांतरण अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (एनआयएच) डेंग्यूवरील लस विकसित केली आहे. या लशीचे तंत्रज्ञान जगभरातील अनेक कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यातून पॅनासिआ बायोटेक ही लस भारतासाठी विकसित करीत आहे.

भारत बायोटेककडून झिकाच्या लसीचे संशोधन
भारत बायोटेककडून झिकावरील लसीचे संशोधन सुरू आहे. कंपनीने लस विकसित केली असून, झिकाच्या निष्क्रिय विषाणूचा वापर या लशीत करण्यात आला आहे. या लशीची पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्थेने या लशीच्या दुस-या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच या चाचण्या सुरू होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR