नागपूर : लग्नाचे वचन दिलेले असेल तरी एखादी व्यक्ती पालकांच्या दबावाखाली येऊन लग्न करण्यास नकार देत असेल तर त्या व्यक्तीला बलात्काराचा दोषी मानता येणार नाही. महाराष्ट्रातील एका प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. आई-वडिलांचा नातेसंबंधाला विरोध असताना एखादी व्यक्ती लग्नाचा वचन देऊनही मागे फिरली, तर त्याला बलात्काराचा गुन्हा म्हणता येणार नाही असे निरीक्षण नागपूर खंडपीठाने नोंदवले. ही टिप्पणी करत न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या एका ३१ वर्षीय व्यक्तीला त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले की, याचिकाकर्त्याला पीडितेशी लग्न करायचे नव्हते असे आढळून आले नाही किंवा त्याने फक्त फायदा घेण्यासाठी खोटी आश्वासने दिली होती असेही दिसत नाही. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये याचिकाकर्ता लग्न करण्यास तयार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी म्हणाले की, त्या व्यक्तीचे आई-वडील लग्नासाठी तयार नव्हते आणि त्यानंतर तो लग्नाच्या आश्वासनावर मागे फिरला. अशा परिस्थितीत त्याने आयपीसीच्या कलम ३७५ अन्वये गुन्हा केला आहे. पण त्याला दोषी मानता येणार नाही.
काय आहे ३७५ कलम?
भारतीय दंड विधानाच्या कलम ३७५ अंतर्गत, महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवण्याचा गुन्हा समाविष्ट आहे. लग्नास नकार दिल्यानंतर न्यायालयाने त्या व्यक्तीला दोषी ठरवून कलम ३७५ नुसार शिक्षा देण्यास नकार दिला आणि त्याची निर्दोष मुक्तता केली.