26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्याच ड्रीम प्रोजेक्टला गुजरातमध्ये खोडा!

मोदींच्याच ड्रीम प्रोजेक्टला गुजरातमध्ये खोडा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला थेट गुजरातमध्येच खोडा घातला गेला आहे. ऑक्टोबर २०२३ पासून बुलेट ट्रेनचे काम बंद आहे. रेल्वेच्या दोन विभागांमधील विवादामुळे हा प्रोजेक्ट खोळंबल्याची माहिती आहे.

मुंबई-अहमदाबाद या नव्याने तयार होत असलेल्या रेल्वे मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाकडे बघितले जाते. मात्र मोदींच्याच गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम थांबले आहे. पश्चिम रेल्वे आणि नॅशनल हाय-स्पीड रेल्वे कार्पोरेशन यांच्यातील तांत्रिक मुद्दा हे त्यामागचे कारण ठरले आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी हाय-स्पीड रेल्वे कार्पोरेशनला पूल उभारण्याची परवानगी दिलेली नाही. अहमदाबादमध्ये असलेले साबरमती ते कालुपूर रेल्वे स्टेशन या दोन स्थानकांदरम्यान असलेला तिसरा रेल्वेमार्ग ब्लॉक करण्याची आवश्यकता आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून अद्याप त्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे काम बंद आहे.

अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होत असलेली ही बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई अशी धावणार आहे. सदरील रेल्वे प्रकल्प जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने उभा रहात आहे. या प्रकल्पानंतर मुंबई आणि अहमदाबाद ही दोन मोठी शहरे २.०७ तासांच्या अंतराने जोडली जातील. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटर असणार आहे.

बुलेट ट्रेनच्या ५०८ किलोमीटरच्या मार्गामध्ये समुद्राखालील मार्ग आणि बोगद्यांचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,०८,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्याच गुजरातमध्ये प्रोजेक्टचे काम थांबले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR