पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अशात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी पक्षवाढीसाठी काय केले असे म्हणत काही दिवसांपूर्वी टीका केली. यावर आता अजित पवार गटातील रुपाली चाकणकर यांनी ‘दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे…’ असे म्हणत कवीतेच्या रूपात उत्तर दिले आहे.
दरम्यान, अजित पवार हे जेव्हा जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी आम्ही केली. यानंतर सुनील तटकरेंसह अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर तुफान टीका सुरू झाली. सुप्रिया सुळे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
‘तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न? दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे तू कुठे काय केलंस? चंदनाच्या खोडाला सहाण विचारे तू कुठं काय केलंस? तो झिजला, पण विझला नाही देहाची कुडीच विचारे तू कुठं काय केलंस? पाया भरला, विटा-वासे तोलून धरले घराचा उंबराच विचारे तू कुठं काय केलंस? नांगर धरला, शेती केली भुईला भीमेचं भान दिलं मुसक्यांची गाठ विचारे तू कुठं काय केलंस? घामाला दाम दिला कष्टाला मान दिला रक्ताचं पाणीच विचारे तू कुठं काय केलंस?’ असे म्हणत सुळे यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे.