30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रहुतात्मा स्मारक गोमुत्राने धुतले तेव्हा भुजबळांना दलित आठवले नाहीत का?

हुतात्मा स्मारक गोमुत्राने धुतले तेव्हा भुजबळांना दलित आठवले नाहीत का?

छत्रपती संभाजी नगर: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना एका नवीन मुद्यावरुन टार्गेट केले आहे. भुजबळांनी शिवसेनेत असताना, दलितांच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारक गोमुत्राने का शुद्ध करुन घेतले होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रविवारी हिंगोलीमध्ये ओबीसींचा दुसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यातून सगळ्याच वक्त्यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्र डागले होते. काहींनी यावेळी भीमा कोरेगावचा संदर्भ देत मराठा समाजावर आक्षेप घेतला होता.

त्याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांना गरजेपुरती दलितांची आठवण होतेय. छगन भुजबळ यांनी दलितांच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारक गोमुत्राने धुवून काढल होते, तेव्हा त्यांना दलितांबद्दल प्रेम नव्हते का? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला.

छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये असताना आणि मुंबईचे महापौर असताना दलितांच्या एका मोर्चानंतर त्यांनी हुतात्मा स्मारक गोमुत्राने शुद्ध करुन घेतले होते, असा आरोप होत आहे. राज ठाकरे यांनीही काही वर्षांपूर्वी हाच मुद्दा उपस्थित करत भुजबळांवर आसूड ओढला होता. आता जरांगे यांनी पुन्हा एकदा तोच मुद्दा काढला आहे.

दरम्यान, सोमवारी पुण्यामध्ये स्वराज्य संघटनेच्या पदाधिका-याने छगन भुजबळ यांच्याजवळ जात घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने शांततेत राहावं, २४ तारखेला आपला विजयाचा दिवस आहे. मराठा समाज शांत आहे, त्यामुळे इतरांनी भडकाऊपणा करु नये.
ओबीसी बांधव आणि आम्ही एकत्र आहोत.. नेते मात्र पाय तोडण्याची भाषा करीत आहेत. जुनाट नेत्यांची वळवळ सुरुच आहे. या वयात त्यांच्या तोंडी शांततेचे शब्द पाहिजेत. २४ तारखेपर्यंत थांबा यांचं सगळे बाहेर काढतो असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR