22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रदिंडोरीची जागा पवार गटाला, नाशिकची ठाकरे गटाला

दिंडोरीची जागा पवार गटाला, नाशिकची ठाकरे गटाला

- शरद पवारांची घोषणा

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा उमेदवार असतील, अशी घोषणा काल खासदार श्रीकांत शिंदेंनी केली. या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभेबाबत मोठी घोषणा केली आहे.

नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट लढविणार आहे. तसेच दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल
शरद पवार म्हणाले की, लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल आहे, शेतक-यांची सत्ताधारी लोकांवर नाराजी आहे. धुळे, नाशिक, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ऊस महत्त्वाचे पीक आहे, त्यापासून इथेनॉल आणि इतर तयार होतात, केंद्राचे धरसोड वृत्ती आहे, त्याचा फटका शेतक-यांना बसतो आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत तर बेरोजगारी महागाईमुळे सर्वसामान्य अस्वस्थ आहेत. यांची किंमत सत्ताधारी पक्षाला बसेल. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारखे काही नाही.

नाशकात हेमंत गोडसे विरुद्ध विजय करंजकर?
नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाकडून विजय करंजकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR