29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी गुंड सरकार बरखास्त करा

महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी गुंड सरकार बरखास्त करा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात खुलेआम गुंडांचा हैदोस सुरू आहे. सरकारच्या आश्रयाने गुंंडगिरी सुरू असून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे त्यामुळे हे घटनाबा गुंड सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोब निवडणूका घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या बाबतीत लवकर निकाल देऊन देशातील लोकशाही वाचवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निघृण हत्येबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. या हत्येचे प्रकरण वरकरणी दिसते तेवढे सोपे नाही. कारण ज्या गुडांने सूड भावनेतून हत्या केली त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो. ज्या प्रमाणे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळ्या झाडतानाचा व्हीडीओ कुणीही न मागता समोर आला. तसे मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले होते; पण त्यामध्ये नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या हे दिसत नाही.

अभिषेकवर गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की आणखी कुणी झाडल्या? या दोघांनाही मारण्याची सुपारी कुणी दिली होती का? अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडाबरोबर एकत्र फोटो आहे. राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपालांकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नसून राज्यपाल हे पद ठेवायचे की नाही, हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे, असेही ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिलो. त्यांना जर मोकळा हात दिला तर ते २४ तासांत गुंडाना तुरुंगात टाकतील; पण सरकार गुंडाच्या मागे उभे राहिले असेल तर हिंसाचार असाच कायम राहिल. काल पुण्यात पत्रकार निखील वागळे, विश्वभंर चौधरी आणि वकील असीम सरोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट दिसत होते; पण पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्याऐवजी यांनाच बसवून ठेवले. भाजपाच्या पदाधिका-याने असा हल्ला करू, अशी धमकी देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. राज्यातील घटनाबा सरकारचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकरण्याचा काहीही उपयोग नाही. कारण हे सरकार शब्दांच्या माराच्या पुढे गेले आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR