मुंबई : वृत्तसंस्था
वक्फ बोर्ड विधेयकावर तयार केलेल्या संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत मोठी वादावादी समोर आली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये वाद झाला आहे. वक्फ बोर्ड संयुक्त संसदीय समितीच्या बैठका अगोदर दिल्लीत झाल्या. त्यानंतर आता पाच राज्यात बैठका आयोजित केल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिलनाडु आणि कर्नाटक मध्ये २६ सप्टेंबर ते १ आॉक्टोबरपर्यंत हा दौरा आहे. मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरु मध्ये बैठका होणार आहेत.
जेपीसी सदस्य या पाचही राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी काम करणा-या संस्थांना भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच वक्फ विधेयक संदर्भात त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये वक्फ बोर्डावरील संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरू होती. परंतु या बैठकीत पहिल्या सत्रातच वादाची ठिणगी पडली. वाद एवढा वाढत गेला की, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बैठकीचा त्याग केला. परंतु ही पहिली वेळ नाही. मागील बैठकीतही आम आदमी पार्टीचे खासदार आणि भाजप महिला खासदारांचा वाद झाला होता. त्यानंतर आता वाद होण्याची ही दुसरी वेळ आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत गुलशन फाऊंडेशनने आपली बाजू मांडली. त्यांनी वक्फ बोर्ड विधेयकाला पाठींबा दर्शवला. पण त्याचवेळी टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी हस्तक्षेप करत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. दोन्ही बाजूंनी वातावरण तापलेले असताना समिती अध्यक्षांनी देखील हस्तक्षेप केला. काही वेळेनंतर पुन्हा विरोधक बैठकीला आले. त्यानंतर बैठक सुरू झाली. वक्फ बोर्ड विधेयकाबाबत या बैठका ठिकठिकाणी होत आहे. त्यातून वाद होत असल्याचे समोर आले आहे.