परभणी : जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवती महिलेचा वेळेवर रुग्णवाहीका न मिळाल्याने उपचाराअभावी गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे. या संदर्भात दि. १३ ऑगस्ट रोजी दोन्ही अधिका-यांचे तात्काळ निलंबनाचे आदेश शासनाने जारी केले आहेत.
जिंतूर येथील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आवश्यक उपचार वेळेत न मिळाल्याने संबंधित महिला आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. कर्तव्य बजावताना नियंत्रणीय व पर्यवेक्षकीय जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी डॉ. लखमावार यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ यांच्यावर प्रशासकीय तसेच आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष, गैरवर्तन तसेच प्रशासकीय व वित्तीय कामकाजात गंभीर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर यांनी शासनाकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे शासनाने डॉ. पांचाळ यांच्याविरुद्धही विभागीय चौकशी प्रस्तावित केली असून, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. निलंबनाच्या कालावधीत डॉ. पांचाळ यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे निश्चित करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परभणीच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विभागीय चौकशीतून या संपूर्ण प्रकरणातील जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. जबाबदारी निश्चित झाल्यानंतर संबंधीत अधिका-यांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
















