मुंबई : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेता आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय पक्षांनी देखील सावध भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मराठा-ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचनाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी बोलताना अजित पवारांनी या सूचना दिल्या आहेत.
अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी ओबीसी किंवा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आमदारांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याची सूचना दिली असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील वातावरण तापत असताना, ओबीसी आमदारांनी आपापल्या तालुका पातळीवर त्यांना जो योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा अशी सूचना देखील दिली गेली आहे.