नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी लॉरा लूमर यांनी मोठे भाष्य केले असून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक खास संदेश पाठवला असल्याचे लॉरा लूमर यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये बोलताना म्हटले आहे. यावेळी लॉरा लूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खास संदेश वाचून दाखवला. लॉरा लूमर यांनी म्हटले की, मी आताच एका तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलले.
तेव्हा ट्रम्प यांनी मला सांगितले की माझा भारतासाठी संदेश आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी. मला भारतीय लोक आवडतात. पंतप्रधान मोदी एक उत्तम नेते आणि माझे चांगले मित्र आहेत. कृपया भारतातील लोकांना सांगा की मी लवकरच पुन्हा एकदा भारतात येईन असे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले असल्याचे लॉरा लूमर यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापार कराराच्या मोठ्या चर्चा सुरू होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी भारत-अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर दोन्ही देशांची अंतरिम सहमती झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. त्यानंतर भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांऐवजी १८ टक्के करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. मात्र, जोपर्यंत भारत-अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर दोन्ही देशांची सहमती होत नव्हती, तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्य करत असल्याचे दिसून आले होते.
तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर भारत आणि पाकिस्तान संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे हे सर्व दावे फेटाळून लावल्यानंतर ते सातत्याने भारताच्या विरोधी वक्तव्य करताना पाहायला मिळाले. मात्र, अमेरिका आणि भारत व्यापार करारावर सहमती होताच आता ट्रम्प यांचा सूर पुन्हा बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी एक मोठा करार होणार
भारत आणि अमेरिकेत आता आणखी एक मोठा व्यापार करार लवकरच होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिले आहेत. राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका एका मोठ्या खनिज व्यापार कराराची तयारी करत आहेत. राजदूत सर्जियो गोर यांच्या खनिज कराराच्या संदर्भातील वक्तव्यामुळे भारत आणि अमेरिका लवकरच खनिजांबाबतच्या कराराची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लवकरच एक महत्त्वपूर्ण खनिज व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याच्या जवळ असल्याचे सर्जिओ गोर यांनी म्हटले आहे.
