हैदराबाद : तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. आता तेलंगणा काँग्रेस प्रदेश कमिटीचे (टीपीसीसी) अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तेलंगणातील दुबक येथे एका जाहीर सभेत संबोधित करताना रेवंत रेड्डी म्हणाले की, केसीआर पुढील महिन्यात निवृत्त होत असल्याने आम्ही त्यांना पेन्शन देऊ आणि काँग्रेस सरकार चेर्लापल्ली तुरुंगात केसीआर यांच्यासाठी दुहेरी बेडरूमचे घर बांधेल, कारण ते गरिबांसाठी घर बांधू शकले नाहीत.
यापूर्वी, बीआरएस प्रमुख केसीआर यांनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) कोडंगलमध्ये दावा केला होता की, रेवंत रेड्डी पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत आणि काँग्रेस २० पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर रेवंत रेड्डी यांनी राव यांच्यावर जोरदार प्रहार केला आणि म्हटले की, काँग्रेसला ८० पेक्षा कमी जागा मिळाल्यास मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. केसीआर यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे आव्हान स्वीकारावे, असे आव्हान रेड्डी यांनी केसीआरला दिले आहे.
तेलंगणातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. येथे बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात दुहेरी लढत दिसत आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसने ८८ जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला १९ आणि भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.