रत्नागिरी : महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोडमधेच प्रवेश दिला जात आहे. ड्रेसकोडनुसार वेशभूषा न करणाऱ्यांना मंदिरात प्रवेशासाठी नकार दिला जात आहे. मंदिरातील नवीन व्यवस्था तात्काळ लागू करण्यात येत आहे. दरम्यान, रत्नागिरीतील ५० मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन, तोकडे आणि अशोभणीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या ड्रेसकोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’तर्फे रत्नागिरी जिल्ह्यात ११ ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.