सावंतवाडी : भारतीय सैन्याने नुकत्याच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन (मानवरहित हवाई यंत्र) उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ही बंदी गुरुवार दि. १५ मे दुपारी १२ वाजेपासून ते ३ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील.
पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार, काही असामाजिक तत्वांकडून ड्रोनचा वापर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्यासाठी किंवा संवेदनशील तसेच पर्यटन स्थळांची रेकी करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अप्रिय घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, अत्यावश्यक कारणांसाठी ड्रोन वापरायची आवश्यकता असल्यास, संबंधित व्यक्तीला सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल. परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास, भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून याचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.