भोपाळ : वृत्तसंस्था
दिल्ली एनसीबी आणि गुजरात एटीएसने मिळून भोपाळमध्ये एका कारखान्यावर छापा टाकून तब्बल १८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या छापेमारीत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुजरात एटीएस, दिल्ली एनसीबीने भोपाळच्या बागरोडा पठार औद्योगिक परिसरात असलेल्या एका कारखान्यावर छापा टाकला. भोपाळच्या बांगरासिया भागात असलेल्या या कारखान्यात कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या कारवाईची भोपाळ पोलिसांना कोणतीही कल्पना नव्हती. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी एक्सवर पोस्ट करत गुजरात एटीएस आणि एनसीबी दिल्लीचे अभिनंदन केले. या कारवाईत एमडी आणि एमडीमध्ये वापरलेले साहित्य जप्त केले. . या दोन्हीची किंमत १८१४ कोटी रुपये आहे.
ड्रग्सविरोधातील ही कारवाई मोठेयश असून अमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणा-या एजन्सीच्या अथक प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी झाली. मध्य प्रदेशात ड्रग्जविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. याआधी गुजरात आणि पंजाबमध्येही अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुद्रा बंदरात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते तर पंजाबच्या अमृतसरमध्ये फॉर्च्युनर कारसह १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते.