नवी दिल्ली : देशात एप्रिलपासून २० टक्के इथेनॉल मिश्रण असलेले ई २० पेट्रोल लागू झाल्यानंतर या इंधनाबाबत सातत्याने विविध चर्चा आणि वाद सुरू आहेत. यातच आता जुन्या वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी बाजारात पुन्हा जुने ई १० पेट्रोल आणले जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खन्ना यांच्या एका वक्तव्यानंतर या चर्चेला उधाण आले होते. मात्र, आता बीपीसीएल आणि केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत ई २० पेट्रोल मागे घेण्याचा किंवा ते बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२७ ऑगस्ट रोजी बीपीसीएलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांशी बोलताना संजय खन्ना यांनी जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल ब्लेंडिंग असलेल्या इंधनाचा पर्याय देण्याच्या शक्यतेवर भाष्य केले होते. कंपनी याच्या विविध ऑपरेशनल बाजू तपासून पाहत असून अजून काहीही निश्चित झालेले नाही, असे ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर बाजारात ई २० ऐवजी पुन्हा ई १० पेट्रोल येणार असल्याच्या बातम्या वेगाने पसरल्या. यावर पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, सरकारच्या पातळीवर ई २० बदलून ई १० आणण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही.
बीपीसीएलने दिली अधिकृत सफाई
वाढत्या चर्चांनंतर बीपीसीएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर स्पष्टीकरण जारी करत म्हटले की, संजय खन्ना यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. संजय खन्ना यांनीही स्पष्ट केले की, ई २० पेट्रोल पूर्णपणे ई १० ने बदलले जाईल, असे वक्तव्य त्यांनी कधीही केलेले नाही.
जुन्या वाहनधारकांना ई २० ची चिंता का?
इंजिनची सुसंगतता : एप्रिल २०२३ नंतर उत्पादित झालेली वाहने ही ई २० सुसंगत आहेत. मात्र, त्यापूर्वीच्या जुन्या गाड्या या ई १० इंधनासाठी डिझाइन करण्यात आल्या होत्या.
पार्ट्स खराब होण्याची भीती
ई २० पेट्रोलमधील इथेनॉलचे जास्त प्रमाण जुन्या वाहनांमधील रबर, प्लास्टिकचे होजेस आणि फ्युएल लाईन्स खराब करू शकते.
मायलेजमध्ये घट
ई २० मुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये काही टक्क्यांची घट होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ आणि सरकारनेही नोंदवले आहे. या सर्व चिंतांमुळे जुन्या वाहनांसाठी वेगळा पेट्रोल पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी सध्या देशात केवळ ई २० पेट्रोलचे धोरणच पुढे नेले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
















