नवी दिल्ली : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या दरात झालेली वाढ, खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क आणि डॉलरच्या वाढत्या किमती यांचा एकत्रित परिणाम राज्यातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसून आला आहे. दरम्यान आगामी अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असून यापूर्वीच खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ होत असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता अर्थ तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
ब-याच दिवसांपासून स्थिर असलेले खाद्यतेलाचे भाव अचानक वाढले आहेत. सण-उत्सव नसतानाही झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे. विशेषत: शेंगदाणा तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. शेंगदाणा तेल २०० रुपये किलोवर पोहोचले आहे. युक्रेन-रशिया संघर्ष, इंडोनेशियाची पामतेल निर्यात धोरणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती यांचा थेट परिणाम भारतातील खाद्यतेल आयातीवर होत आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात दर वाढत आहेत. साधारणत: सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात वाढ होते. मात्र, यंदा कोणताही मोठा सण नसतानाही तेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर आठवड्याला दरवाढ होत असल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक भाव शेंगदाणा तेलाचा वाढला
बाजारात शेंगदाणा तेलाचे दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागील दोन महिन्यांत शेंगदाणा तेलात वाढ झाली असून ग्राहकांना पर्यायी तेलांकडे वळावे लागत आहे.
अनेक दिवस स्थिरतेनंतर तेल महागले
गेल्या अनेक महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर जवळपास स्थिर होते. मात्र, जानेवारीपासून अचानक दरवाढीचा ट्रेंड सुरू झाला असून, ही वाढ टप्प्याटप्प्याने होत आहे.
आगामी काळाचा अंदाज काय?
पुढील एक-दोन महिन्यांत नवीन आवक वाढली नाही तर तेलाचे दर आणखी ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दिलासा मिळाल्यास दर स्थिर होऊ शकतात.
दरवाढीमागे काय कारणे?
अतिवृष्टीमुळे सोयाबीन व शेंगदाण्याचे उत्पादन घटले, सोयाबीनच्या हमीभावात वाढ, खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क, डॉलर महागल्याने आयात खर्च वाढला, जागतिक बाजारातील अस्थिरता आदी कारणे दिसून येत आहेत.
कुठल्या तेलाचे भाव किती वाढले? (प्रतिकिलो दर)
तेल – नोव्हेंबर – जानेवारी
सोयाबीन तेल – १४५ रु. – १६५ रु.
सूर्यफूल तेल – १५० रु. – १७० रु.
शेंगदाणा तेल – १८५ रु. – २०५ रु.
पाम तेल – १२० रु. – १३५ रु.
कापूस बी तेल – १४० रु. – १५८ रु.
मोहरी तेल – १६० रु. – १७८ रु.

