पुणे : पुण्यातील डिसेंट फाऊंडेशन, आदित्य फिचर्स आणि नळदुर्गमधील ‘आपलं घर’चे माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून ‘आपलं घर’च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी साहित्यवाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘समाजात वावरताना केवळ चांगल्या गोष्टी टिपून त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपली वाट आपण चालायची, हेच आपले जीवनसूत्र असले पाहिजे’ असे सुराणा यांनी सांगितले. तसेच या मदतवाटपाबाबत त्यांनी कृतज्ञतापूर्वक आनंद व्यक्त केला.
वयाच्या ९६ व्या वर्षीही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असर्णाया पन्नालाल सुराणा यांनी आतापर्यंत सुमारे ३००० विद्यार्थ्यांचे पुनर्वसन केले असून एकलमातांच्या सक्षमीकरणासाठीही त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. ‘आपलं घर’मधील कार्यक्रमाला राष्ट्रसेवा दलाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, जी. एम. जगताप आणि आदित्य फिचर्सचे सुधीर मोकाशे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अजित शिंदे यांनी या विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रगतीसाठी अधिकाधिक योगदान देणार असल्याचे सांगितले. मोकाशे यांनी ‘आपलं घर’ या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी येणा-या भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे, विशेषत: पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्यानंतर साहाय्य करण्याची हमी दिली.
विद्यार्थी सहायक समितीच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून अनाथ मुलांना शैक्षणिक मदतीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. सदर कार्यक्रमाची सुरवात ‘आपलं घर’मधील बालकांच्या समूहगायनाने झाली. संतोष बुरंगे यांनी प्रास्तविक भाषणामध्ये या संस्थेची वाटचाल कशी झाली, माजी विद्यार्थ्यांनी येर्णाया काळात कोणकोणत्या जबाबदा-या पार पाडायला हव्यात याविषयी मनोगत व्यक्त केले. अलियाबाद येथील धरित्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. चव्हाण आणि बालाजी शिंदे यांच्यासह ‘आपलं घर’चे माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उद्धव लांडे यांनी केले. निराधारांना आधार देणा-या या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर मुलामुलींना येणा-या अडचणींचा विचार करता कोणत्या उपाय योजना आखल्या पाहिजेत, याबाबत वर्षाराणी बिराजदार, नितीन मनाळे, महेश मोरे इतर विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवीण पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.