27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार

मुंबई : (प्रतिनिधी)
संख्याबळानुसार भाजपने मुख्यमंत्रीपद स्वत:कडे घेण्याचे ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला दावा सोडून भाजपचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. पण पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी व आमदारांनी आज शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी विनंती केली.

रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची बैठक होत असून या बैठकीत खातेवाटपाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्यामुळे एवढे प्रचंड यश मिळूनही महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी लांबत चालला आहे. आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली असल्याने पुढील वर्षभर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवावे अशी शिंदे यांची मागणी होती. परंतु भाजपने त्याला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला दावा मागे घेतला. यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु तीन पक्षातील खातेवाटप व अन्य बाबी निश्चित करूनच एकदमच शपथविधी करावा असे दिल्लीतून सांगण्यात आले आहे.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले असले तरी शिवसेनेला महत्वाची खाती मिळाली पाहिजेत यावर ते ठाम आहेत. तसेच स्वत: उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे, फडणवीस व अजित पवार या तिघांनाही दिल्लीत बोलावले आहे.

फडणवीस व अजित पवार दुपारीच दिल्लीला पोहचले होते. तर शिंदे सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. रात्री साडे नऊ वाजता या नेत्यांची बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय झाल्यावर नव्या सरकारचा शपथविधी नक्की केव्हा होणार याबाबत स्पष्टता होऊ शकेल.

दरम्यान आज शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्री व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती त्यांना केली.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी भरघोस मतं देऊन सरकारला प्रचंड बहुमत दिले आहे असे असताना आपण सरकारपासून लांब राहिलात तर वेगळा संदेश जाईल, शिवाय पक्षाची मजबुतीने बांधणी करायची असेल स्वत: शिंदे यांचे सत्तेत असणे आवश्यक असल्याची भूमिका आमदारांनी मांडली. अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आपण याबाबत निर्णय घेऊ असे शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR