मुंबई : राज्यातील चुरशीच्या ठरलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे अर्ध्याहून अधिक निकाल जाहीर झाले असून त्यात महायुतीने वर्चस्व गाजविल्याचे आकडे आहेत. राज्यात आघाडी सरकारसाठी पोषक वातावरण असल्याचे म्हटले जात होते. खास करून भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला फोडल्यानंतर मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात होते. परंतू ग्रामपंचायतीच्या निकालातून मात्र वेगळंच चित्र समोर आले आहे. २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात महायुतीला सर्वाधिक ११०१ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
तर मविआला ४७३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुपारच्या तीन वाजेपर्यंतच्या आकडेवारीत २३५९ पैकी १८१० ग्रामपंचायतींचा निकाल लागला आहे. या ग्रामपंचायतीत शिंदे गटाला फायदा झाला असून २२६ ग्रामपंचायती काबिज केल्या आहेत. तर ठाकरे गटाला १०३ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे.
राज्यात २३५९ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झाले. सोमवारी सकाळपासून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सत्ताधारी महायुतीने बाजी मारली असून दुपारी तीन वाजेपर्यंत महायुतीला सर्वाधिक ११०१ ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे. भाजपाचा ६०२, काँग्रेस १६४, पवार गट १५५, अजित दादा गट ३१५ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. सत्तेत असल्याचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे. शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रामीण भागात अधिक पसंती मिळाल्याचे निकाल सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांना ग्रामीण भागात पसंती मिळाली असून त्यांच्या सोबत आलेल्या गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, भरत गोगावले आदी नेत्यांना त्यांच्या मतदार संघात जादा ग्रामपंचायती मिळाल्याने शिंदे गटाला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २२६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व गाजविण्यात यश आले आहे. महायुतीने केलेल्या कामाला मतदारांनी कौल दिल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला धार
शिवसेना ठाकर गटाचे वर्चस्व असलेल्या मराठवाडा, विदर्भ, कोकण भागातील निकालाने फटका दिल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. शिवसेनेतून फूटून गेलेल्या बंडखोर नेते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रामपंचायती निकालाने बळ दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढविणार असल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला बळीकटी मिळाल्याचे चित्र आहे. या निकालाने राज्यातील ग्रामीण जनता शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाला आहे.