मुंबई : बॉलिवूडमधून सध्या एकापेक्षा एक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. सलमान खानच्या धमक्यांच्या बातम्या समोर येत असतानाच आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सलमाननंतर आता एकता कपूर अडचणीमध्ये सापडली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या काही अॅडल्ड सीनमुळे एकता कपूर आणि तिची आई अडचणीत सापडली आहे. ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सीझन ६ च्या एका एपिसोडमध्ये अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्ये आहेत. अशी दृश्ये दाखवल्याप्रकरणी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सीरिजमध्ये पॉक्सो नियमांचे उल्लंघन करणारी काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या वेबसीरिजमध्ये सिगारेटच्या जाहिराती वापरून महापुरुष आणि संतांचा अपमान करण्यात आला असून त्यामुळे भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
दरम्यान, पॉक्सोसोबतच माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, महिला प्रतिबंध कायदा १९८६ आणि सिगारेट, इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ सारख्या कायद्यांचेही उल्लंघन झाले आहे. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर एकता आणि तिच्या आईविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.