मुंबई : प्रतिनिधी
धुळे जिल्हयातील पिंपळनेर प्रभाग क्रमांक २, नाशिक जिल्हयातील मनमाड प्रभाग क्रमांक १० आणि बीड जिल्हयातील गेवराई प्रभाग क्रमांक ११ येथील उमेदवारांचे निधन झाल्याने तेथील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. मात्र अध्यक्षपदासाठी या प्रभागात मतदान होणार आहे. या तीन प्रभागांच्या सदस्य पदांच्या निवडणूकांकरिता नव्याने निवडणूक कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
धुळे जिल्हयातील पिंपळनेर प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार कुसूमबाई पाथरे, नाशिक जिल्हयातील मनमाड प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार नितीन अनिल वाघमारे, बीड जिल्हयातील गेवराई प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार दूरदानाबेगम सलीम फारूकी या तीन उमेदवारांचे निवडणूक लढविणा-या वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर निधन झाले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हयांच्या जिल्हाधिका-यांनी निवडणूक आयोगास निवडणूक प्रक्रियेबाबत विचारणा केली होती.
आयोगाने कायदयाच्या तरतुदींनुसार प्रभागाची विभागणी दोन जागांमध्ये करण्यात येत असल्याने दोन्ही जागांकरिता निवडणूक प्रक्रिया थांबविणे क्रमप्राप्त आहे. मात्र अध्यक्षपदाच्या या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात येत नसून अध्यक्षपदाची या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहिल असे संबंधित जिल्हाधिका-यांना कळविले आहे. या तीन प्रभागांच्या सदस्य पदांच्या निवडणूकांकरिता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

