लातूर : ग्राहकांना अखंडित, उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यासाठी विकलेल्या वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी महावितरण आक्रमक झाली असून बील भरण्यास टाळाटाळ करणा-या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडीत करण्याची मोहीम मवितरणने हाती घेतली आहे. गेल्या २४ दिवसांत २ हजार ३५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
मार्च महिण्याची चाहूल लागताच महावितरणने वीजबील वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. थकबाकीसह चालू महिण्याचे वीजबील वसूल करणे महावितरणसमोर एक आव्हानच असते. आज रोजी लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील लातूर परिमंडळाच्या वीजग्राहकांकडे जानेवारी अखेर २९९ कोटी रूपयांची थकबाकी असून फेब्रुवारी महिण्याची ८४ कोटी ५४ लाख रूपयांची मागणी आहे.
थकबाकी व मागणी असे एकत्रीत ३८३ कोटी ६१ लाख रूपयांची वसूली फेब्रुवारी अखेर पर्यंत करावयाची आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील ९६ कोटी ७७ लाख, बीड जिल्हयातील १५९ कोटी ९८ लाख तर धाराशिव जिल्हयातील १२६ कोटी ८५ लाख रूपये रकमेचा समावेश आहे. गेल्या २४ दिवसात बीड जिल्हयातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून १९ कोटी ९२ लाख रूपये वसुल झाले आहेत. तसेच धाराशिव जिल्हयातील वीजग्राहकांकडून १६ कोटी २२ लाख रूपये वसुल झाले आहेत. तर लातूर जिल्हयातील वीजग्राहकांनी ३३ कोटी ५२ लाख रूपयांचा भरणा केला आहे.
थकबाकी वसुलीसाठी जनमित्रांसह अधिकारीही वीजबील वसुलीसाठी फिरत असून गेल्या २४ दिवसात बील न भरणा-या २१५७ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. तर १९९ वीजग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. वसुली मोहीम मार्च अखेर पर्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून वीजग्राहकांनी चालू बीलांसह थकबाकीचाही भरणा करावा अन्यथा कटू कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा महावितरणने दिला आहे. कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या वीजग्राहकांना अभय योजने अंतर्गत थकबाकी वरील व्याज व दंड माफ करण्यात येणार असून योजनेचा लाभ ग्रहकांनी घ्यावा असेही महावितरणने कळवले आहे.
खंडीत केलेल्या वीजग्राहकांची जिल्हानिहाय माहिती
१. बीड मंडळ- कायमस्वरूपी- ९० तात्पुरता-४४७
२.धाराशिव मंडळ- कायमस्वरूपी- ३९, तात्पुरता- ९३३
३. लातूर मंडळ- कायमस्वरूपी- ७०,
तात्पुरता- ७७७