26.7 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत पेच कायम

महायुतीत पेच कायम

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. त्याबाबत दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप ३३, शिवसेना १० ते १२ आणि राष्ट्रवादी ३ ते ४ जागा लढवेल, असा फॉर्म्युला तयार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. परंतु शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत अंतिम तोडगा निघू शकला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनी म्हणजेच ११ मार्च रोजी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, असे सांगण्यात आले.

राजधानी दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महायुतीतील जागावाटपावर चर्चा होणार आहे. येत्या ११ मार्चला दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. अमित शाहांच्या महाराष्ट्र दौ-यापूर्वी एकनाथ शिंदे गटाने २२ तर अजित पवार गटाने १६ जागांची मागणी केली होती तर अमित शाहांच्या मुंबई भेटीनंतर एकनाथ शिंदे ११ आणि अजित पवार ५ जागांवर तयार होतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप तोडगा निघाला नसल्याचे बोलले जात आहे.

भाजप दोन्ही गटांना एक अंकी जागा सोडण्याच्या विचारात आहे, अशी चर्चा रंगली. या गोंधळामुळे तिन्ही पक्षाचे जागावाटपावर एकमत होत नाही आणि पेच वाढत चालला आहे, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, असे दिसून येत आहे.

कथित ९-९० चा फॉर्म्युला?
भाजपसोबत जाण्याआधी अजित पवारांनी लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या ९० जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. त्यानुसारच अजित पवार महायुतीत सामील झाले. पण आता हा फॉर्म्युला पाळला जात नसल्याने अजित पवार नाराज झाले आहेत. अर्थात ते अजूनही रिचेबल आहेत. मात्र, भाजपवर दबाव वाढवून त्यांचा जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR