31.9 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeसोलापूरमधला मारुती चौकातील अतिक्रमण हटविले

मधला मारुती चौकातील अतिक्रमण हटविले

सोलापूर  : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मधला मारूती चौक परिसरात महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाला पाहताच चार चाकी हातगाडीवाले, पथविक्रेते यांची चांगलीच पळापळ झाली, धांदल उडाली.. सराफ कट्टा, फूल बाजार परिसरात फूटपाथवर तसेच रहदारीस अडथळा ठरणारे दुकानासमोरील अतिक्रमित बोर्ड, बाकडे,डिजिटल फलक, टेबल हटविण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्यावतीने अतिक्रमण हटण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मध्यवस्ती असा गजबजलेल्या सराफ कट्टा, फूल बाजार व मधला मारुती परिसरात अतिक्रमण प्रतिबंधक पथकाचा फौजफाटा पाहताच या रस्त्यांवरील चार चाकी हातगाडीवाले, पथविक्रेते यांची पळापळ झाली. काही वेळातच येथील रस्ता मोकळा झाला.

येथील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण शीडीच्या साहायाने काढण्यात आले. परिसरात दुकानासमोर अतिक्रमण करून बांधलेले कडे आणि लावण्यात आलेले डिजिटल फलक, दुकानाचे फूटपाथवरील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने उद्‌ध्वस्त करण्यात आले. महापालिका जागेवर बेकायदेशीरपणे करण्यात आलेले बांधकाम रहदारी अडथळा ठरणारे व फूटपाथवरील अतिक्रमण हटविताना नोटीस देण्याची गरज नाही, असे अधिकार्‍यांनी
सांगितले.

वाहतुकीची कोंडी, अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले. नागरिकांनी आपापल्या जागेतच नियमानुसार आपला व्यवसाय व्यापार करावा अतिक्रमण करू नये. कारवाई करुनही पुन्हा आढळल्यास किंवा इतर कुठेही अतिक्रमण केल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. अतिक्रमण करणे तसेच अतिक्रमण कारवाईस विरोध करणे हा गुन्हा आहे.

टिळक चौक ते मधला मारुती ते सराफ कट्ट्यापर्यंत अतिक्रमणांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून या परिसरात वाहतुकीची नेहमीच कोंडी झाल्याचे दिसून येते. असे माजी नगरसेवक अमर पुदाले यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR