व्हॅटिकन सिटी : व्हॅटिकनने एक ऐतिहासिक निर्णय घेत समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी रोमन कॅथलिक धर्मगुरूंना मान्यता दिली आहे. ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मान्यता दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयात व्हॅटिकनने सोमवारी सांगितले की रोमन कॅथलिक धर्मगुरू समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देऊ शकतात जोपर्यंत ते नियमित चर्च विधी किंवा धार्मिक विधींचा भाग नसतात.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हॅटिकनच्या सिद्धांत कार्यालयातील एका दस्तऐवजात असे म्हटले आहे की अशा आशीर्वादांमुळे अनियमित परिस्थितींना कायदेशीर मान्यता मिळणार नाही. पण देव सर्वांचे स्वागत करतो. दरम्यान, व्हॅटिकन केवळ स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंधांना कायदेशीर मानते. चर्चने त्यांच्या निर्णयाला प्रतिसाद देताना म्हटले आहे, भिन्नलिंगी विवाहाच्या संस्काराशी कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये. ख्रिश्चन धर्मगुरूंनी प्रत्येक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा आणि जर एखाद्या व्यक्तीला चर्चमध्ये येऊन देवाचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर त्याला आत येण्यापासून रोखणे चुकीचे आहे. या ऐतिहासिक निर्णयावर पोप यांनी ऑक्टोबरमध्येच काही अधिकृत बदलांवर विचार केला जात असल्याचे संकेत दिले होते.
८ पानांचे दस्तावेज ज्याचे शीर्षक ऑन द पास्टोरल मिनिंग ऑफ ब्लेसिंग्ज असे आहे. त्यात विशिष्ट परिस्थितींचे वर्णन करण्यात आले आहे. तर ११ पानांच्या विभागाचे अनियमित परिस्थितीत जोडप्यांना आशीर्वाद आणि समंिलगी जोडपी असे शीर्षक आहे. चर्च असे शिकवते की समंिलगी आकर्षण हे पाप नाही तर समलैंगिक कृत्ये पाप आहेत. २०१३ मध्ये नियुक्त झाल्यापासून पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिक प्रश्नांवर नैतिक सिद्धांत न बदलता १.३ अब्ज सदस्य असलेल्या चर्चने एलजीबीटी लोकांचे अधिक स्वागत करण्याचा प्रयत्न केला आहे.