मुंबई : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी येथे केली. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सन २०२७ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले.
मागील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठविण्यात आली होती. या पथकाने नोंदविलेल्या सूचना आणि त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
रस्ते मार्गांचे बळकीटकरण
सिंहस्थसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
धार्मिक कॉरिडॉर निर्माण करा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे. नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तासह इतर कुंडांच्या सौंदर्यीकरण केल्यास भाविकांना तेथे जाता येईल.
डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ व्हावा
कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियोजन तसेच सर्व्हेलन्ससाठी जास्तीत जास्त ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा. ज्या भागातून जास्त गर्दी होते त्या रस्त्यांवर गर्दीच्या नियोजनासाठी आणि भाविकांना वेळ घालविता यावा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत केली. दरम्यान कुंभमेळा कालावधीत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावीत्यासाठीचे नियोजन करण्याची सूचना गिरीश महाजन यांनी यावेळी केली.