डेहराडून : उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना बाहेर काढण्यात अद्याप कोणतेही ठोस यश मिळालेले नाही. हे कामगार बोगद्यात अडकून १४४ तासांहून अधिक काळ लोटला आहे. कामगारांना बाहेर काढण्याचे काम पाहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम संथरित्या सुरु आहे. आत्तापर्यंत मजुरांना बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी २४ मीटरपर्यंत (४ पाईप्स) ढिगाऱ्यात टाकण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत परिस्थिती तशीच होती. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक बाहेर अत्यंत चिंताग्रस्त आणि घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
परवानगी घेतल्यानंतर ते बोगद्यातील पाईपद्वारे आपल्या परिजनांशी बोलतात. बोगद्यात अडकलेल्या आपल्या भावाशी बोललेल्या बिहारमधील एका व्यक्तीने माध्यमांना सांगितले की, आता आत अडकलेल्या सर्वांची प्रकृती ठीक नाही. तो म्हणाला की, त्याचा भाऊ त्याला सांगत होता की आता शेवटची वेळ आल्यासारखे वाटत आहे. बिहारहून आलेल्या एका व्यक्तीने माध्यमांना सांगितले की, त्याचा मेहुणाही बोगद्यात अडकला आहे. पाईपद्वारे मेव्हण्याशी बोलले असता त्यांची प्रकृती खराब असल्याचे त्यांनी सांगितले. आता तिथे त्यांना गुदमरल्यासारखे वाटू लागले आहे.
नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड (एनईसीएल) या बोगद्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दोन पर्यवेक्षकांनी सांगितले की, या बोगद्याचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. त्यापैकी एकाने सांगितले की, बोगद्याचे काम पूर्ण होण्याच्या काही दिवसापूर्वी भूस्खलनामुळे बोगद्याचा एक भाग ज्या ठिकाणी कोसळला, त्याच ठिकाणी भूस्खलनात नुकसान झाले. त्यानंतर ते बांधण्यासाठी सहा महिने लागले. पण कदाचित ते मजबूतपणे बांधले गेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.