23.4 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्ही ५०० पार जरी गेला असतात, तरी हा देश ‘भारत राष्ट्रच’ राहणार

तुम्ही ५०० पार जरी गेला असतात, तरी हा देश ‘भारत राष्ट्रच’ राहणार

टी. राजाच्या वक्तव्यावरून मिटकरींचा पलटवार

अकोला : प्रतिनिधी
भाजपने ५०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असे वक्तव्य आमदार राजा सिंह यांनी भिंवडीतील संमेलनात केले होते. टी. राजा यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार टी. राजा सिंह यांच्या विधानावर तुम्ही ५०० चा आकडा पार जरी केला असता तरी हा देश ‘भारत राष्ट्रच’ राहणार असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, तेलंगणातील भाजप आमदार आणि हिंदू धर्माचे प्रचारक आमदार टी. राजा यांचा भिवंडीतील दौरा अगोदरच वादग्रस्त ठरला होता.

यावेळी, केलेल्या भाषणातून त्यांनी पु्न्हा एकदा ‘४०० पार’च्या ना-यावर भाष्य केले. भाजपने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असे वक्तव्य आमदार राजा सिंह यांनी भिंवडीतील संमेलनात केले होते. त्यावर, आता अमोल मिटकरी यांनी पलटवार करत, तुम्ही ५०० पार जरी केले असते, तरी हे हिंदू किंवा इस्लाम राष्ट्र होणार नाही, असे म्हटले आहे.

कदाचित टी. राजाला हे माहिती नसावं की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले. या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचे नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच नाव देण्यात आले आहे. ४०० पार नाही, तुम्ही ५०० पार जरी गेला असतात, तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी टी. राजा यांच्या भाषणानंतर पलटवार केला आहे.

हिंदू धर्मामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाला आपण मानता. त्या भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य, ग्लानिर्भवती ‘भारत’ असा उपदेश दिला आहे. टी. राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यांनी अभ्यास करावा. कोणाचीही सत्ता आली तरी हा देश भारत राष्ट्र राहणार आहे, हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR