परभणी : प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा अशा भारतीय शास्त्रीय संगीताचे स्थान हे जगभरात महान व अनन्यसाधारण आहे, असे मत ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांनी व्यक्त केले.
येथील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात ग्रंथराज पुर्णवाद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ३ दिवसीय संगीत संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. राहुल पाटील, संगीत संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे, जीवनकला मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश कुरूंदकर, उत्सवमूर्ती महामहोपाध्याय सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर, ओम पुर्णवादी संगीत अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संगीता पारनेरकर उपस्थित होत्या.
यावेळी उस्ताद उस्मान खाँ म्हणाले की, आज आपण कलाकार म्हणून जगभर फिरतोय ते शास्त्रीय संगीताच्या बळावरच. आपण कुणीच नव्हतो आणि नाही. आपणास या सतारनेच मोठे केले आहे. कलावंताने स्वत: मोठे होतांना कलेलाही मोठे केले पाहिजे, असे नमूद करतेवेळी भारतीय शास्त्रीय संगीताचे जगभरातील स्थान हे अनन्यसाधारण आहे. प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असे ते शास्त्रीय संगीत महान आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी प. पू. रामचंद्र महाराजांनी पुर्णवादातून मांडलेले तत्वज्ञान जीवन जगण्यासाठी अतिशय श्रेयस्कर व अनुसरणीय असल्याचे मत आ. डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात एकनाथ मोरे यांनी अतिशय खुमासदारपणे विचार मांडले.
यावेळी गुणेशदादा पारनेरकर, श्रीकांत देशपांडे, मोरेश्वर इनामदार, शशी अय्यर यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.संगीता पारनेरकर यांनी केले. प्रारंभी विश्राम परळीकर पंचाहत्तर गायकांनी पुर्णवादी गीत सादर केले. त्यानंतर श्रीराम गुरू शैव यांनी वेदपठण केले. सूत्रसंचालन सीमंतिनी कुंडीकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने रसिकश्रोते उपस्थित होते.