मुंबई : आयपीएलच्या मेगालिलावात मुंबई इंडियन्सच्या संघमालकांनी दुस-या दिवशी दमदार शॉंिपग केल्याचे दिसून आले. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सध्या दोन दिवसीय लिलाव सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या संघानेही लिलावासाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगितले जात होते. या तयारीचा अंदाज कालच्या पहिल्या दिवसात फारसा आला नाही. पहिल्या दिवशी त्यांनी अवघे ४ खेळाडू खरेदी केले.
दुस-या दिवशी मात्र मुंबईने चांगले शॉपिंग केले. काही बडे तर काही युवा खेळाडू मुंबईने खरेदी केले. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्याबाबतीत धक्कादायक बाब घडली. पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्सकडे असलेला अर्जुन यावेळी अनसोल्ड राहिला. लिलावाआधी मुंबईने त्याला रिलीज केले होते. लिलावात त्याला विकत घेतले जाईल अशी अपेक्षा होती. ३० लाखांच्या मूळ बोलीवर तो लिलावात उतरला होता. पण एकाही संघाने त्याला घेण्यात रस दाखवला नाही. अखेर यंदाच्या हंगामासाठी तो विकला गेला नाही.
अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज तर आहेच. पण त्यासोबतच तो फलंदाजीतही झटपट धावा करण्याची क्षमता राखतो. म्हणूनच २०२२ च्या हंगामासाठी त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. त्यानंतर त्याला तीन वर्षे मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात कायम ठेवले. पण दुखापतीमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली. २०२३ च्या हंगामासाठी त्याला मुंबईने पुन्हा एकदा ३० लाखांच्या बोलीसह संघात घेतले. त्या हंगामात त्याने ४ सामन्यात ३ बळी घेतले आणि १३ धावा केल्या. त्यानंतर २०२४च्या हंगामात त्याला केवळ एकच सामना खेळायला मिळाला. त्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही. आणि गोलंदाजीतही एकही बळी घेता आला नाही.