26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रपिपाणीने घेतलेल्या मतांमुळे जिंकलो

पिपाणीने घेतलेल्या मतांमुळे जिंकलो

दिलीप वळसे पाटील यांची कबुली शरद पवारांचीही घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी या निवडणूक चिन्हाचा फटका बसला आहे. शरद पवार गटाला ज्या मतदारसंघात पिपाणीने दणका दिला त्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आंबेगावमधील अटीतटीच्या लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील निवडून आले आहेत. वळसे पाटील यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्याला पिपाणी या चिन्हाने घेतलेल्या मतांचा लाभ झाल्याची कबुली दिली.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जाऊन वळसे पाटील यांना पाडण्याचे आवाहन केले होते तरीही वळसे पाटील यांनी १ हजार ५२३ मतांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यावर मात केली. त्याच वेळी पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असलेल्या देवदत्त शिवाजी निकम या भारतीय धर्म निरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराने २ हजार ९६५ मते घेतली. या मतांचा फटका शरद पवार यांच्या देवदत्त निकम यांना बसला.

या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीविषयी वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने मी बैठकीला उपस्थित होतो. बैठकीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानबाबत वेगवेगळ्या विषयांवर उपयुक्त चर्चा झाल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार प्रचाराच्या वेळी सभेत काय बोलले हे मी विसरलो आहे. या बैठकीत राजकीय विषयावर काहीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात काय घडले यावर चर्चा झाली; पण माझ्या स्वत:च्या निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही. यंदाची निवडणूक वेगळ्या प्रकारची होती, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्याचे वळसे पाटील म्हणाले.

अनेक विधानसभा मतदारसंघांत पिपाणी चिन्हाला मते मिळाली आहेत त्याचा लाभ तुम्हाला झाला का? या प्रश्नावर, पिपाणीने काही मते घेतली हे खरे आहे त्याचा लाभ मलाही झाला; पण महाराष्ट्रातील बाकीच्या मतदारसंघांत निवडणुकीत पिपाणीचा लाभ झाला की नाही यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR