नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर गेल्या काही काळापासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या बैठकांमध्येही ते हजर नसल्याची माहिती आहे. अशातच, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन, अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम लावला. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे ठामपणे सांगितले.
शशी थरूर मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक असल्याची चर्चा सुरू आहे. यावर स्पष्टीकरण देताना थरूर म्हणाले, मी खासदार आहे. तिरुवनंतपुरमच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. संसदेत त्यांच्या हितांचे रक्षण करणे हेच माझे काम आहे. मुख्यमंत्रिपदाची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही.
खरगे-राहुल गांधी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान गुरुवारी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ही बैठक संसद भवनातील खरगे यांच्या कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर थरूर यांनी सांगितले की, चर्चा अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक झाली असून पक्षात सर्व काही ठीक आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र आहोत.
मी नेहमीच पक्षासाठी प्रचार केला
थरूर पुढे म्हणाले, पक्षाचे दोन प्रमुख नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्यासोबत चर्चा झाली. संवाद अतिशय चांगला, सकारात्मक आणि रचनात्मक होता. मी नेहमीच पक्षासाठी प्रचार केला आहे. मी कुठे प्रचार केला नाही, असे मला कोणी दाखवू शकते का? आगामी केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार करणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केले की, मी आधीही प्रचार केला आहे आणि पुढेही करत राहीन.

