22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाविझाग कसोटीत बरोबरीची अपेक्षा

विझाग कसोटीत बरोबरीची अपेक्षा

मैदानाबाहेरून

२ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. येथील राजशेखर रेड्डी स्टेडियमवर फक्त दोन कसोटी झाल्या असून दोन्ही कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. २०१६ मध्ये इंग्लंडवर २४६ तर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०३ धावांनी विजय मिळवला होता. येथे टीम इंडिया निश्चितच विजय मिळवेल अशी अपेक्षा आहे. फिरकी विरुद्ध स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे फटके मारण्याची प्रॅक्टिस टीम इंडियाच्या फलंदाजांनी केलेली दिसली.

क्रिकेट नियामक मंडळाने दुस-या कसोटीसाठी सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतले. तसेच रजत पाटीदार देखील संघात आहेच. अशा वेळी प्लेईंग ११ मध्ये सर्फराज खानला या सामन्यासाठी संधी मिळायला हवी. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गेल्या काही काळापासून सातत्याने भरपूर धावा करतोय. इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने आपली चमक दाखवून दिली होती. त्यामुळे त्याचा संघात समावेश व्हावा.

गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी अद्याप फारशा धावा केलेल्या नाहीत. गेल्या १० डावांमध्ये त्या दोघांच्याही फलंदाजीला सूर गवसलेला नाही. त्यांच्याकडून संघाला सध्या खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा ते नक्की पूर्ण करतील. त्याशिवाय जर खेळपट्टी फिरकीला पोषक असेल तर आपला संघ अधिक आक्रमक पद्धतीने खेळू शकतो. अशा वेळी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून फक्त जसप्रीत बुमराह दिसेल.
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्या कसोटीत त्याने दमदार धावा केल्या होत्या. पण रोहित शर्माला मात्र अर्धशतकही पूर्ण करता आले नव्हते. त्यामध्येच शुभमन गिल हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडूही नाही. त्यामुळे भारतीय संघाला फार कमी वेळात तीन धक्के बसतात आणि त्यामुळे त्यांना मोठ्या धावसंख्येचा पाया उभारता येत नाही. कारण पहिल्या तीन खेळाडूंनी जर चांगली फलंदाजी केली तरच संघाला मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. त्यामुळे कसोटी सामन्यात पहिले तीन फलंदाज सर्वांत महत्त्वाचे असतात.

आता तर दुस-या सामन्यात लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा हे मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजही संघात नसतील. त्यामुळे दुस-या कसोटीत भारताला थोडी संयमी फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी रोहित शर्माची भूमिका या सामन्यात महत्त्वाची असेल, जी संपूर्ण संघाच्या धावसंख्येला दिशा देऊ शकते. रोहित आणि गिल दोघेही चांगल्या फॉर्मात नाहीत, त्याचबरोबर संघात तीन अनुभवी फलंदाजही नाहीत. त्यामुळे रोहित शर्मा जर तिस-या स्थानावर फलंदाजीला आला आणि त्याने हा एक मोठा बदल केला तर भारतीय संघाची चिंता मिटू शकते. कारण गिलला सलामीला पाठवले आणि त्याची जागी बदलली तर कदाचित त्याच्या फलंदाजीत चांगले बदल पाहायला मिळू शकतात.
दुसरीकडे रोहित हा तिस-या स्थानावर येईल. यापूर्वी चेतेश्वर पुजारा हा या स्थानावर फलंदाजीला यायचा आणि भारताच्या धावसंख्येला आकार द्यायचा. हीच गोष्ट आता रोहित शर्माला करावी लागणार आहे. रोहित तिस-या स्थानावर आला तर तोपर्यंत चेंडू थोडा जुना झालेला असेल आणि रोहितला सेट व्हायला जास्त वेळ मिळू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा हा तिस-या स्थानावर आला आणि गिलला सलामीला पाठवले तर भारतीय संघाला चांगला बदल पाहायला मिळू शकतो. गिल हा सलामीवीर आहे, पण रोहित संघात असल्यामुळे त्याला तिस-या स्थानावर फलंदाजीला यावे लागते. पण रोहित तिस-या स्थानावर आल्यावर सा-या गोष्टी ठीक होतील, अशी आशा चाहत्यांना आहे.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR