बीड : गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथे रमजान ईदच्या आदल्या दिवशीच २ समाजकंटकांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जिलेटीन कांड्या लावून स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणात दोन्ही आरोपी अटकेत होते. त्यांना पोलिस कोठडीसाठी शनिवारी बीडच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांच्याविरोधात ‘यूएपीए’ म्हणजेच दहशतवादी कृत्य केल्याचे कलम वाढविले आहेत.
अर्धामसला येथे जुन्या वादातून वाद झाले. यावेळी गावातीलच विजय गव्हाणे व श्रीराम सागडे यांनी जिलेटीन लावून धार्मिक स्थळात स्फोट घडवून आणला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी दोन्ही आरोपींना तातडीने अटक केल्याने आणि हिंदू-मुस्लीम समाजात शांततेची बैठक घेतल्याने हे वातावरण शांत झाले होते. यातील आरोपींना २ वेळा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर शनिवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले.
यावेळी यूएपीए कायद्यातील कलम १५, १६, १८ व भारतीय न्याय संहितातेतील कलम ११३ हे कलम वाढविले आहेत. पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी ही माहिती दिली. तसेच दोन्ही आरोपींना ९ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे ‘यूएपीए’ कायदा?
यूएपीए कायद्यातील कलम १६ म्हणजे दहशतवादी कृत्य आणि १८ म्हणजे कट रचणे. हा गुन्हा गंभीर असतो. यातील आरोपीला कमीत कमी ५ वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यूएपीए कायद्याला मराठीत बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा असे यास म्हटले जाते. दहशतवादी कारवाया करणे किंवा त्या कृतीत सामील होणे, असाच अर्थ यूएपीएचा होतो. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन-समर्थन देणे, दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत करणे, प्लॅनिंग करणे, अशी व्याख्या या कायद्याची आहे.