30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeसोलापूरशिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजेंविरूद्ध खंडणीचा गुन्हा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजेंविरूद्ध खंडणीचा गुन्हा

सोलापूर : शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे, नाहीतर मला १५ टक्क्याप्रमाणे ११ लाख रूपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहायक अभियंत्याच्या कार्यालयातच शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आकाश उत्तम कानडे (रा. बार्शी रोड, मानेगाव, वैराग, ता. बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. १ जुलैला मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात व २ जुलैला महापालिकेचे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

आकाश उत्तम कानडे यांना अभियंता दिपक रामचंद्र कुंभार यांच्या माध्यमातून १ जुलैला सात रस्ता येथील संपर्क कार्यालयात बोलावून घेतले.वअक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामाची निविदा मागे घे किंवा वर्क ऑर्डर ७६ लाखांची असून १५ टक्क्यांप्रमाणे ११ लाखांची मागणी केली. फिर्यादी आकाश उत्तम कानडे यांनी नकार दिल्याने काळजे यांच्याकडून दमदाटी व शिवीगाळ आणि अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरविण्याची धमकी देण्यात आली.

फिर्यादी २ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दिपक कुंभार यांच्यासमवेत सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले असता मनीष काळजेसोबत असणारा राजेंद्र कांबळे हा त्याठिकाणी होता आणि त्याने काळजेला फोन करून मी तेथे आल्याची माहिती दिली.काहीवेळाने काळजे व त्याचा चालक तेथे आले, त्याने राग मनात धरून दोन्ही हाताने तोंडावर चापटा मारल्या.

दिपक कुंभार म्हणाले, माझ्या कार्यालयात असे काही करू नका म्हणून बाजूला केले. त्यावेळी तु निविदा काढून घे किंवा मला दे नाहीतर तुला सोलापुरात राहू देत नसल्याची काळजेकडून कानडे यांना धमकी देण्यात आली.काळजेला नकार दिल्याने पुन्हा त्याने व त्याच्या चालकाने शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.मंगळवारी (ता. २) दुपारी एक-दोनच्या सुमारास घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद कानडे यांनी सदर बझार पोलिसांत दिली होती. पण, रात्री अकरा वाजल्या तरीसुद्धा अद्याप फिर्याद तथा एफआयआर दाखल झाला नव्हता. त्यामुळे रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारून त्यांना सक्त सूचना केल्या व ते काहीवेळाने तेथून गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR