मुंबई : सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधाने करणे टाळायला हवे होते. एकमेकांवर टीका करणे योग्य नाही असे वक्तव्य भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांना योग्य तो संदेश दिला असल्याचे दरेकर म्हणाले. एसआयटी ही मोठी तपास यंत्रणा आहे. जर सुरेश धस यांना काही महत्त्वाची आर्थिक माहिती मिळाली असेल, तर त्यांनी ती एसआयटीकडे सुपूर्द करायला हवी असेही दरेकर म्हणाले.
जेव्हा एसआयटी स्थापन केली गेली, तेव्हा वाल्मिक कराड आणि पोलिसांच्या संबंधांची कोणतीही माहिती नव्हती असे दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस शेतक-यांना न्याय देतील. लाडक्या बहिणीलाही पैसे मिळतील आणि शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी योग्य ती पावले उचलली जातील असेही दरेकर म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबात वक्तव्य केले आहे. अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत, अजित पवारांचं धनंजय मुंडे जवळ काय अडकले आहे असा सवाल त्यांनी भर सभेमध्ये उपस्थित केला होता. त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी परभणीत काढण्यात आलेल्या मोर्चात देखील सुरशे धस यांनी अजित पवार यांच्याबाबात वक्तव्य केल होते.
अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी सुरेश धस यांच्यावर देखील टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धसांना समज द्यावी अशी मागणी देखील केली होती.