मुंबई : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अजित पवार यांना ‘आपल्या सहका-याला वा-यावर सोडू नका,’ असा सल्ला देत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केले आहे. दाऊदच्या सहका-याशी आर्थिक व्यवहार केल्याच्या कारणावरून तुरुंगवास भोगून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, यासंदर्भात फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून आपली भूमिका परखडपणे मांडली होती.
त्यानंतर अजित पवार यांनीही काहीशी सावध भूमिका घेत नवाब मलिक हे आमच्या गटात आहेत किंवा नाहीत, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावरच मी बोलेन, असा पवित्रा अजित पवारांनी घेतला होता. त्यानंतर विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांचा भूतकाळ खणून काढत सरकारला पुन्हा कोंडीत पकडले होते. नवाब मलिक यांच्याप्रमाणेच प्रफुल्ल पटेल यांच्यावरही दाऊदच्या सहका-याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. मग देवेंद्र फडणवीस नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत वेगवेगळी भूमिका का घेतात, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.
नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप व तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. मग प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली – ईडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपाला चालते पण नवाब मलिक चालत नाहीत. इतकेच काय? आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेड आणि सनब्लिेक रिअल इस्टेट या कंपन्यांची ईडीद्वारे टेरर फंडिंग तसेच इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे. भाजपाने या कंपन्यांकडून २० कोटी देणगी घेतली तेही चालते. आता भाजपा नेते भाजपा अध्यक्षांना पत्र कधी लिहिणार?, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला. तसेच अजितदादांनी आपल्या सहका-याला भाजपाच्या दबावात वा-यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी.
पत्रकारांना धमकावू नये
एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून उगीच ‘एक मिनिट- एक मिनिट’करून पत्रकारांना धमकावू नये, असा सल्ला सचिन सावंत यांनी अजितदादांना दिला आहे. यावर आता अजितदादा गट किंवा भाजपच्या गोटातून काही प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रोखठोक बोलणारे अजितदादा अडखळले
देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरबॉम्बनंतर एरवी कोणत्याही गोष्टीवर रोखठोक बोलणारे अजित पवार मलिकांच्या मुद्यावरून बचावात्मक पवित्रा घेताना दिसले होते. नवाब मलिक यांच्याविषयी प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे अजित पवार प्रसारमाध्यमांवर चांगलेच संतापले. फडणवीसांच्या पत्राचे काय करायचे ते मी बघून घेईन. त्याबाबत मीडियाला उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दु:ख व्यक्त केले होते. प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वत:च्याच सहका-याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटते, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली होती.