जालना : प्रतिनिधी
लोणगावात २०० हेक्टर जमीनीवर रताळ्याची लागवड करण्यात आली असून, लोणगावला रताळ्याचे माहेर घर म्हणून ओळखले जात आहे. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण तोंडावर आला असल्यामुळे रताळी काढणीला वेग आला आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा रताळ्याच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार ते १२०० रूपये दराप्रमाणे व्यापारी खरेदी करीत आहे. या वर्षी उत्पादनात निम्याने घट झालेली आहे. शेतक-यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे.
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतक-यांनी पारंपारीक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेऊन गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली जात आहे. लोणगाव येथील प्रत्येक शेतक-यांने १ ते ४ एकरापर्यंत, तर अल्पभूधारक शेतक-याने किमान १० गुंठ्यात रताळ्याची शेती करीत आहे.
लोणगाव येथील शेतक-यांचा रताळ्याची शेती करण्यावर अधिक भर आहे. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणा-या रताळाची उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला फराळ म्हणून मोठी मागणी असते. शेतक-यांनी महाशिवरात्री जवळ आल्यामुळे जमिनीतून रताळ्यांची काढणी सुरू केली आहे. ही रताळी महाशिवरात्रीला बाजारात विक्रीसाठी नेली जाते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. गतवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक-यांनी रताळे लागवडीवर अधिक भर दिला होता.