नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेता आर. माधवनला मंगळवारी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आर. माधवनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात माधवन अत्यंत प्रभावी दिसत होता, त्याच्या हँडसम अशा जेंटलमन लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पण, या सगळ्यात लक्षवेधी ठरलं ते आर. माधवच्या हातातलं घड्याळ.
पद्म पुरस्कार स्वीकारताना, आर. माधवन याने नेव्ही ब्लू रंगाचा ब्लेझर वेअर केलेला. त्यासोबत विना-फ्रेमचा चष्मा, सोन्याची चेन आणि तपकिरी लेदरचा पट्टा असलेले घड्याळ… यामुळे त्यांच्या लूकला एक वेगळीच शोभा आलेली. घड्याळांची आवड असलेल्या नेटक-यांकडून त्याच्या या महागड्या घड्याळाची विशेष दखल घेतली गेली. बरं हे काही सामान्य घड्याळ नव्हतं, त्याने टायटनच्या ‘नेबुला’ कलेक्शनमधलं ‘जलसा’ हे लिमिटेड-एडिशन घड्याळ घातलं होतं, जे अत्यंत खास आणि महागडे मानले जाते. माधवनच्या घड्याळावर सर्वांच्या नजरा खिळल्या.
आर. माधवन यांच्याकडील आलिशान घड्याळ म्हणजे, ‘टायटन नेब्युला जलसा फ्लाईंग टर्बिलॉन’ हे टायटनच्या प्रीमियम ‘नेब्युला कलेक्शन’मधील एक उत्कृष्ट लग्झरी वॉच. १८-कॅरेट रोझ गोल्ड केसपासून बनवलेलं हे घड्याळ भारतीय कारागिरी आणि आधुनिक घड्याळ-निर्मितीचा एक अप्रतिम संगम आहे. यातली सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, हातानं रंगवलेला मार्बल डायल, जो जयपूरच्या प्रसिद्ध ‘हवा महाल’पासून प्रेरित आहे. राजस्थानी लघुचित्रकलेच्या (मिनिएचर पेंटिंग) शैलीत केलेले याचे बारकावे, या घड्याळाला सर्वोत्कृष्ट बनवतात.
जगभरात केवळ १० लोकांकडेच ‘लिमिटेड-एडिशन’ घड्याळ आर. माधवनच्या हातातलं ‘टायटन नेब्युला जलसा फ्लाईंग टर्बिलॉन’ हे लग्झरी वॉच भारतीय ब्रँडच्या सर्वांत खास आणि दुर्मिळ घड्याळांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात या घड्याळाचे केवळ १० युनिट्स तयार करण्यात आलेत, ज्यामुळे हे घड्याळ वॉच कलेक्टर्ससाठी एक्सक्लूसिव्ह बनलंय.
दरम्यान, आर. माधवनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘अल्फा’ सिनेमात झळकणार आहे, ज्यामध्ये त्याचा एक छोटासा कॅमिओ आहे.
















