चंदिगड : फेब्रुवारी महिन्यामध्ये पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी याकरिता प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतक-यांनी पुन्हा एकदा ‘दिल्ली चलो’चा नारा दिला होता. मात्र, त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आले. या सगळ्याचे पडसाद आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन राज्यांमध्ये दिसून येत असून प्रचारासाठी आलेल्या भाजपा नेत्यांना शेतक-यांकडून ठिकठिकाणी मज्जाव केला जात आहे. १ जून रोजी पंजाब आणि हरियाणातील काही भागांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, पंजाबमधील खेड्यापाड्यांमधील संतप्त शेतकरी प्रचारासाठी जाऊ इच्छिणा-या भाजपा उमेदवारांना रोखत आहेत.
दरम्यान, पंजाबमध्ये एक जून रोजी लोकसभेच्या सर्व तेरा जागांसाठी मतदान होणार असून, येथे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीसह, गोवा, गुजरात आणि हरियाणामध्ये हे दोन्ही पक्ष हातात हात घालून एनडीएविरुद्ध लढत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या राज्यात आठ जागा जिंकल्या होत्या. विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरूर मतदारसंघातून तेव्हा विजय मिळवला होता.
चारही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे प्रचाराला रंग चढू लागला आहे. भाजप या राज्यातून प्रथमच सर्व जागांवर लढत आहे. यापूर्वी अकाली दलाशी युती असताना भाजपला तीन-ते चार जागांवर समाधान मानावे लागत असे. फिरोजपूरमध्ये भाजपने राणा गुरमीत सिंह सोढी यांना, तर संगरूर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून अरविंद खन्ना यांना रिंगणात उतरवून हिंदू कार्ड खेळले आहे.
पंजाबमध्ये यावेळी बेरोजगारी आणि शेतमालाला हमीभाव हे मुख्य मुद्दे असल्याचे दिसून येते. सत्तारूढ मान सरकारला बेरोजगारीचा विषय सोडविता आलेला नाही. याचाच फायदा घेत काँग्रेसने राष्ट्रीय महागाईसह शेतक-यांची नाराजी, हे मुद्दे प्रचारात आणले आहेत. पंजाबमध्ये शेतमालाचे प्रचंड उत्पादन होत असल्यामुळे तेथील २० लाख शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत आहेत. जो पक्ष आमचा हा कळीचा मुद्दा सोडवेल त्यालाच मतदान, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. अकाली दलाने याच विषयावरून भाजपची साथ सोडली होती. तथापि, दिवसेंदिवस हा पक्ष या राज्यात निष्प्रभ होत असल्याचे दिसून येते. प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसने आम आदमी पक्षावर थेट टीका करणे टाळण्यावर भर दिला आहे.
शेतक-यांचा सामूहिक भ्रमनिरास
दरम्यान, पंजाबमधील मालवा आणि माझा पट्ट्यांमध्ये प्रचारासाठी गेलेल्या भाजपा उमेदवाराला काळे झेंडे दाखवून अडवणूक करण्यात आली होती. तर दुसरीकडे, शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत भाजपाविरोधात तक्रार केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान प्रश्न उपस्थित करणा-या शेतक-यांना भाजपा नेत्यांच्या सुरक्षा कर्मचा-यांकडून धक्काबुक्की करत उद्धट वर्तनाला सामोरे जावे लागल्याचा आरोप त्यांनी केला.
हरियाणातही भाजपाविरोधात असंतोष
गेल्या आठवड्यात हरियाणामधील काही संतप्त शेतक-यांनी भाजपाचे सोनीपतचे उमेदवार मोहनलाल बडोली यांच्या प्रचारफेरीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अशोक तन्वर (सिरसा), रणजित चौटाला (हिसार), अरविंद शर्मा (रोहटक) आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (कर्नाल) यांसारख्या भाजपाच्या इतर उमेदवारांनाही नियमितपणे अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागतो आहे.