हिंगोली : जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील दहा शेतक-यांनी किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सोयाबीन व कापसाला भाव मिळत नाही. पीक विम्याची रक्कम शेतक-यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसे कोठून आणायचे, यासाठी किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार, डोळे २५ हजारांत विक्री काढल्याचे शेतकरी म्हणाले आहेत.
यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असे असताना सरकारकडून शेतक-यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, सोयाबीन, कपाशी आदी पिकांना योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील दहा शेतक-यांनी किडणी ७५ हजार रुपये दहा नग, लिव्हर ९० हजार रुपये दहा नग, डोळे २५ हजार रुपये दहा अशा प्रकारे स्वत:चे अवयव विकत घ्या अशी मागणी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
…यामुळे अवयव विक्रीचा निर्णय घेतला
अनेक शेतक-यांनी खाजगी, सरकारी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज व इतर उसनवारी करून खिरपाच्या पेरण्या केल्या. मात्र, अपेक्षित पाऊस झालाच नाही. पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले, तर दुसरीकडे बोंडअळी लागल्यामुळे कापसाच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. थोडेफार पीक पदरी पडत असताना त्याला देखील योग्य भाव मिळत नाही. सोयाबीन, कापूस उद्ध्वस्त झाला, दुष्काळ पडला, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, अनुदान नाही. अशात पीक कर्ज भरायचे तरी कसे? त्यामुळे आम्ही शेतक-यांनी आमचे अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शेतक-यांनी दिली आहे.