मुंबई : राज्यातील शेतर्कयांवर अवकाळीचे संकट कोसळले आहे. लाखो हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी अतिवृष्टी व आता अवकाळीने त्रस्त झाले असताना सत्ताधारी इतर राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. शासन कापसाची निर्यात करू न शकल्याने दर कमी झाल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्य शासनावर केला.
येथील शासकीय विश्राम भवनात बुधवारी (ता.२९) आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड. आशिष देशमुख, जिल्हाध्यक्षा प्रा.वर्षा निकम, आशा मिरगे आदी उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सन २०२२ मध्ये २७२ व २०२३ वर्षांत आतापर्यंत १८३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी निवडणुकीचा प्रचार करीत आहेत. केंद्र शासनाने आधारभूत किंमती जाहीर केल्या.
त्या अत्यंत कमी आहेत. कापसाला सहा हजार ६२० रुपये, तर सोयाबीनला चार हजार ६०० रुपये दर दिला जात असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. आधारभूत किंमतीसाठी टाळ कुटणारे कुठे गेले असा प्रश्नही उपस्थित करीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाशा पटेल यांच्यावर निशाणा साधला.
कंत्राटी आरोग्य कर्मचारी सव्वामहिन्यापासून आंदोलन करीत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष नाही, शेतर्कयांना नुकसानभरपाई मिळाली नाही, प्रोत्साहन व कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल बंद असून, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधा-यांना वेळ नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.