मुंबई : ट्रिपल सीट बाईक चालवणे किती धोक्याचे ठरू शकते याचेच एक उदाहरण मुंबईतील परळ येथे बघायला मिळाले. येथे एका बाईकवर ट्रिपल सीट जात असलेल्या तिघांचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. परळ पुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणींसह एकाचा मृत्यू झाला आहे.
तनिष पतंगे (वय २४), रेणुका ताम्रकर ( वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. हे तिघेही बाईकवरून ट्रिपल सीट जात होते. तेवढ्यात दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणा-या डम्परला आदळली आणि हा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन तरुणी आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ट्रिपल सीट बाईक चालवणे या तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.
हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज वाहनावरून येतो. बाईक डम्परवर इतक्या जोरात धडकली की बाईकच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर, ट्रकचेही नुकसान झाले आहे. डम्परला धडकल्यानंतर बाईकवरील तिघेही जखमी झाले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. या अपघातानंतर तिघांना तात्काळ केइएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.