पालघर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणा-या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घोलप यांनी जुगार अड्ड्याबद्दल तक्रार केल्यामुळे आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. घोलप यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणा-या राजकीय पदाधिका-यांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचे प्रकार समोर आला आहे. जव्हार तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणाचा मुद्दा समोर आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास घेत छडा लावला असता अशोक धोडी यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले.
येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांनी सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी पुढाकार घेत यासंदर्भात जुगार अड्डा चलविणार्यंची जव्हार पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रार अर्जाच्या वादातून निर्मला घाटाळ उर्फ फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, नीलम फर्नांडिस, ज्योती फर्नांडिस, कलीम काझी व कलीम काजी याची पत्नी (सर्व रा. डॅम आळी, जव्हार) यांनी घोलप यांच्या कृतीचा राग मनात ठेवून घोलप यांच्या गांधी चौक येथील जुन्या घराजवळ जमून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.