कंधार : सय्यद हबिब
कंधार ते लोहा रस्त्यावर सहा किलोमीटरच्या अंतरावर एकापाठोपाठ दोन बसेस नादुरुस्त झाल्याने भर उन्हात महिला मुलासह प्रवाशांना उन्हात ताटकळत थांबावे लागले कंधार आगाराला नादुरुस्त बसेसचे ग्रहण लागले आहे. परंतु हे ग्रहण सोडण्यास अद्यापही एकाही अधिकाऱ्याला यश आले नाही. त्यामुळे या आगाराच्या बसेस रस्त्यात केव्हा, कुठे, कधी बंद पडतील, हे काही सांगता येत नाही. ऐन रस्त्यात बसेस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशाची हेळसांड थांबवण्यासाठी वरिष्ठांनी नादुरुस्त बसेसकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशी करत आहेत.
प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी दि १६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कंधार आगारातून निघालेली कंधार पंढरपूर बस ही ३ कि.मी अंतरावर मांजरमकर पेट्रोल पंपासमोर नादुरुस्त झाली तर त्याचवेळी नांदेड-कंधार एम एच १४ बी टी १५१० ही बस किरोडा घाटात नादुरुस्त झाली यामुळे सर्वच प्रवाशांना भर उन्हात पर्यायी वाहनांची वाट पाहत मनस्ताप सहन करावा लागला. सातत्याने बंद होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
मागील एक वर्षाच्या दरम्यान एसटीने काही नवीन प्रवासी योजना आणत बस व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. कंधार आगारातून राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा नफा देत असून प्रवाशांनीही खास करून महिलावर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याने बस गतिमान होऊ लागली असताना आगारातून निघणाऱ्या बसेस सुस्थितीत आहेत का? याचा शहनिशा होण्याची गरज आहे. परंतु आगारातून निघणाऱ्या बसेस चांगल्या अवस्थेत आहे की नाही याची खात्री न करता दिल्या जात असल्याने प्रवाशांसह चालक वाहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कंधार आगारातून निघालेली कंधार पंढरपूर बस प्रवाशांनी भरलेली होती बस कंधार आगारातून थोडी पुढे गेली आणि गिअर टाकण्यास अडथळे येऊ लागल्याने चालकांनी बस परत कंधार बस स्थानकावर आणून उभी केली. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कंधार आगारातून पुन्हा दुसरी बस मागवली. मात्र तिचीही स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे प्रवाशांकडून समजले कंधार आगाराचे काम जुन्या ६५ बसेसवर चालू आहे. त्यामुळे त्यांचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढत आहे. स्टिअरिंग ऑइल नाही, गिअर पडत नाही. रेडीएटरमध्ये पाणी नाही.
टायरांची दुरवस्था, स्टार्टर खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे या बाबी नेहमीच्याच झाल्या आहेत. यामुळे नवीन बस नसल्याने लांब पल्ल्यासाठीही जुन्याच बस वापराव्या लागत आहेत. खरे तर दहा लाख किमी किंवा दहा वर्षे असे निकष असताना जुन्या बसेस १५ लाख किमी पेक्षा जास्त असून त्यांना १५-१५ वर्षे झाल्याचे दिसून येत आहे.”लांब पल्ल्याच्या बसेस तरी चांगल्या दर्जाच्या असाव्यात. अर्ध्या रस्त्यावर बस नादुरुस्त झाल्याने प्रवासी तसेच लहान मुलांचे खूप हाल होतात. मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.