जेरुसलेम : गाझामधील युद्धबंदीचा करार संपुष्टात आल्यानंतर इस्रायली लष्कराने त्याची मोहीम तीव्रतेने सुरू केली आहे. गाझामध्ये घरे, रस्त्यावर आणि बोगद्यांमध्ये भीषण संघर्ष सुरू असून हमासच्या संघटित पलटवारामुळे इस्रायली सैन्य गाझामध्ये सर्वात कठीण लढाईला सामोरे जात आहे. तसेच इस्रायल आणि पॅलेस्टिन संघर्षाची व्याप्तीही वाढली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून इस्रायली सैन्य आणि लेबनॉनमधील गट हिजबुल्लाह यांच्यात संघर्षाला सुरवात झाली आहे. दोघांनीही एकमेकांच्या स्थानांवर हल्ले केले आहेत. तसेच हमासकडून सुरू असलेला संघटित लढा इस्रायलला निराश करू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इस्रायली लष्कराचे (आयडीएफ) म्हणणे आहे की, त्यांच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी रात्री हिजबुल्लाच्या स्थानांवर अनेक हवाई हल्ले केले आहेत. हिजबुल्लाहच्या ऑपरेशनल केंद्रांना लक्ष्य केले गेले. लेबनॉनमधून शुक्रवारी रात्री इस्रायलच्या दिशेने अनेक अस्त्रही डागण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. लेबनीजच्या बाजूने ज्या स्थानांवरून हे हल्ले करण्यात आले त्या ठिकाणांना हवाई हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे की संघर्ष सुरू झाल्यापासून ते गाझामध्ये सर्वात कठीण लढाईला सामोरे जात आहे.
यूएन कौन्सिलमध्ये युद्धबंदीच्या विरोधात अमेरिकेने व्हेटो दिल्यानंतर इस्रायलला आता लढण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. लढाई ज्या गतीने सुरू आहे, ते पाहता इस्त्रायलला आपली लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघर्ष करत आहे. इस्रायली लष्कराने एका अहवालात म्हटले आहे की, युद्धाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिने लागू शकतात. तसेच हमास केवळ इस्रायली भागांवर रॉकेट डागत नाही तर गाझामधील रस्त्यांवर इस्त्रायलविरुद्ध लढत आहे आणि इस्त्रायली सैनिकांना हानी पोहोचवत आहे.
नवजात मुलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
इस्रायल आणि हमास विरुद्धच्या युद्धाने अकल्पनीय मानवतावादी आपत्ती आणली आहे. गाझा येथील अल नसर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये नवजात मुलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवजात बालकांचे मृतदेह अजूनही आयसीयू बेडवर जीवरक्षक उपकरणे जोडलेले दिसतात. चार नवजात मुलांचे मृतदेह सापडले असून काहींचे सांगाड्यात रूपांतर झाले आहे.
३०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात दोन महिन्यांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २४ तासांत गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात ३०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युएनने आणलेला ठराव फोल ठरला आहे. अमेरिकेच्या व्हेटोमुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.
चर्चा करण्यास नकार
सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री आणि अरब नेत्यांनी गाझाच्या भवितव्याबाबत तपशीलवार चर्चा करण्यास
अमेरिकेला नकार दिला आणि त्यांनी म्हटले की, पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायली सैन्य कारवाई तात्काळ थांबावी. अमेरिकेने यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.