सॅँटिअॅगो : मध्य आणि दक्षिण चिलीच्या जंगलामध्ये आगीमुळे आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. चिलीच्या राष्ट्रपतींनी या बाबीस दुजोरा दिला आहे.. आगीमुळे मृत्यू पावणा-यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमच्या वतीने आगीमुळे भस्मसात झालेल्या घरांचा तपास सुरु झाला आहे. आग वरचेवर वाढत असून त्यामुळे धोका वाढत चालला आहे. चिली सरकारने आणीबाणीची घोषणा केली आहे.
चिलीच्या जंगलांमध्ये आग लागणे नवीन बाब नाही. येथील तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळेच संकट आणखीनच वाढले आहे. ही आग मुख्यत्वे करुन वालपरिसो पर्यटन क्षेत्राच्या आसपास लागली आहे. येथील हजारो हेक्टरवरील जंगल नष्ट झालेले आहे. किना-यालगतच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर वाढला असून रहिवाशी लोकांनी स्थलांतर सुरू केले आहे.
आपत्कालीन कार्यवाहीचा भाग म्हणून सरकारने शनिवारपासूनच संचारबंदी लागू केली. गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी शनिवारी १९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. १५८ ठिकाणी आग लागली असून त्यामुळे ४३ हजार क्षेत्र बाधित झालेले आहे.
चिलीतील आगीमुळे राजधानीच्या नैऋत्येकडील एस्ट्रेला आणि नवीदाद या शहरातील एक हजार घरे जळून खाक झाली आहेत. पिचिलेमूच्या सर्फिंग रिसॉर्टजवळील लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे.