जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझामधील युद्धविरामाचा पाचवा दिवस आहे. याआधी दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करणाऱ्या कतारने युद्धविराम ४८ तासांनी वाढवण्याची घोषणा केली होती. या युद्धबंदीच्या काळात इस्रायलच्या तुरुंगातून तीन पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. त्या बदल्यात हमास आणखी ओलिसांची सुटका करण्याची शक्यता आहे. सोडण्यात येणार्या कैदी आणि ओलिसांची यादी तयार केली जात आहे. पण हमासचे म्हणणे आहे की, गाझा पट्टीमध्ये सर्व ओलिसांना ठेवण्यात आलेले नाही. हमासच्या या वक्तव्यावरून परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते, असे मानले जात आहे.
तसेच इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता युद्धविराम दोन दिवसांसाठी वाढवण्याचा करार झाला आहे. या विस्तारित कराराअंतर्गत हमास आणखी २० इस्रायली ओलीसांची सुटका करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. यासोबतच इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे की, वाढीव करारामध्ये ते आपल्या तुरुंगातून ५० अतिरिक्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहेत. इस्राईली पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सकाळी सांगितले की, अतिरिक्त इस्रायली ओलिसांच्या सुटकेच्या अधीन असलेल्या अतिरिक्त ५० पॅलेस्टिनी महिला कैद्यांच्या सुटकेला इस्रायली सरकारने मान्यता दिली आहे.
मदत साहित्य हे समुद्रातील थेंबाप्रमाणे
युद्धबंदीच्या परिस्थितीचा फायदा घेत संयुक्त राष्ट्राने गाझामधील लोकांना मदत सामग्रीचा पुरवठा वाढवला आहे. मात्र सध्या पाठवले जाणारे मदत साहित्य हे समुद्रातील थेंबाप्रमाणे असल्याचा इशाराही संयुक्त राष्ट्राने दिला आहे. या तात्पुरत्या युद्धबंदीच्या विस्तारामुळे, मदत सामग्रीने भरलेली अधिक वाहने गाझापर्यंत पोहोचू शकतील.
११ ओलीसांची सुटका
सोमवारी रात्री हमासने ११ ओलिसांची सुटका केली. ज्यामध्ये जर्मन, फ्रेंच आणि अर्जेंटिनियन नागरिकांचाही समावेश होता. त्याचवेळी इस्रायलने रात्री उशिरा आपल्या तुरुंगातून ३३ पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी ट्विटरवर लिहिले की, सुटका करण्यात आलेल्या ११ इस्रायलींपैकी अनेकांकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे.